लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील एकाकडून फायनान्स कंपनीचे कर्ज असणारा ट्रक नोटरी करून विकत घेत साडेतीन लाखांची फसवणूक करणाऱ्या विट्यातील एकास पोलिसांनी अटक केली. लखन रामचंद्र ठोंबरे (वय २६, रा. विटा) असे त्याचे नाव आहे. फसवणुकीची घटना फेब्रुवारी २०११ मध्ये घडली होती.
याबाबत प्रकाश शरणाप्पा पुजारी (वय ३५, रा. साखराळे) याने ऑगस्ट २०१८ मध्ये पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यामध्ये लखन रामचंद्र ठोंबरे आणि वैभव तानाजी सकट (दोघे, रा. विटा) यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
ठोंबरे व सकट यांनी फेब्रुवारी ते मे २०१८ या कालावधीत हा गुन्हा केला. पुजारी याच्याकडून त्याच्या मालकीचा मालट्रक (क्र. एमएच ०८ डब्ल्यू २८७६) नोटरी करून विकत घेतला होता. या करारपत्रामध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत हा ट्रक नावावर करून घेत फायनान्स कंपनीचे कर्ज व त्यावरील हप्ते फेडण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र या दोघांनी ट्रक नावावर करून न घेता त्याचे हप्तेही फेडले नाहीत. पुजारी याने वारंवार पाठपुरावा करूनही त्याला दोघांनी धमकावले. त्यानंतर पुजारी याने पोलिसांत धाव घेतली. हा गुन्हा दाखल झाल्यापासून ठोंबरे व सकट हे दोघे पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर विटा परिसरात एका पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून मिरविणाऱ्या लखन ठोंबरे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पोलीस हवालदार अमोल चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
चौकट
लेखन ठोंबरे आणि वैभव सकट यांनी फसवणूक करून घेतलेल्या या ट्रकचा वापर वाळू चोरीसाठी केला होता. विटा येथील तहसीलदारांनी हा ट्रक जप्त करून त्यावर ६ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा ट्रक अद्यापही प्रकाश पुजारी याच्या नावावर असल्याने ही दंडाची पावती पुजारी याच्या नावावर फाटली आहे.