कासेगाव : लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या दोनच दिवस आधी नवरदेव कोरोनाबाधित झाल्याने वधूकडील लोकांची समजूत काढून नियोजित विवाह पुढे ढकलण्यात आल्याची घटना तांबवे (ता. वाळवा) येथे घडली. पै-पाहुण्यांनाही माहिती देऊन विवाहाची तारीख नंतर कळवण्यात येईल असे सांगण्यात आले.
तांबवे येथील तरुणाचे कऱ्हाड तालुक्यातील तरुणीशी लग्न ठरले होते. नवरदेव पुणे येथील कंपनीत नोकरीस आहे. पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. २२ एप्रिल ही विवाहाची तारीख ठरली होती. घरात लग्नाची लगबग सुरू होती. वस्तू व कपड्यांची खरेदी झाली होती. पै-पाहुण्यांना कळवण्यात आले होते. अचानक चार दिवसांपासून नवरदेवाला ताप, सर्दीचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी नवरदेवाची कोरोना चाचणी करण्याची सूचना केली. कुटुंबियांनी तत्परता दाखवत नवरदेवाची कोरोना चाचणी केली आणि तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. कुटुंबातील लोकांनी ही माहिती वधू व तिच्या परिवाराला कळवली. नवरदेव पूर्णपणे बरा झाल्यानंतरच लग्न करू, असा निर्णय उभय पाहुण्यांच्या सहमतीने घेण्यात आला.
दरम्यान, त्या नवरदेवास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.