मिरज : मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील कृष्णा नदीवरील पुलास भगदाड पडले आहे. या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
मिरजेतून कोल्हापूर जिल्ह्यास जोडणाºया कृष्णा नदीवरील कृष्णा घाट येथील पुलास गेल्या काही महिन्यांपासून तडे जात आहेत. सध्या या पुलास एकाजागी मोठे भगदाड पडल्याचे दिसून येत असून, दिवसेंदिवस पूल धोकादायक बनत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला होता. मिरज-अर्जुनवाड रस्त्यावर असलेल्या या पुलाला जागोजागी पडलेले तडे, त्यातच मुख्य पुलावर पडलेले भगदाड यामुळे पूल दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. पुलाच्या मध्यभागी रस्त्यावरील लोखंडी अॅँगल, सळया बाहेर आल्या आहेत. यामुळे पडलेल्या भगदाडातून पुलाखालील नदीचे पाणी दिसत आहे. मोठी अवजड वाहने पुलावरुन जाताना पूल कंप पावतो. यामुळे पुलाला ठिकठिकाणी भेगा पडत आहेत.
तत्कालीन आमदार डॉ. एन. आर. पाठक यांनी पाठपुरावा केल्याने या पुलाची उभारणी झाली होती. तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, तसेच पूल धोकादायक ठरणार असेल तर, पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी कृष्णा घाट येथील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.