इस्लामपूर : गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून अखंडपणे शोषित, वंचित आणि पीडितांची सेवा करणाऱ्या येथील ‘माणुसकीचं नातं’ या सेवाभावी ग्रुपने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल ६६२ जणांनी रक्तदान करून रक्तापलीकडच्या नात्याची वीण गुंफली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होण्याचा हा राज्यातील विक्रम समजला जात आहे.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाच्या भयकाळातही समाजातील प्रत्येक घटकाला आधार देण्याचे मोठे विधायक काम या ग्रुपने उभारले आहे. हजारो नागरिकांना अन्नदान, शेकडो कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ऑक्सिजनअभावी होणारी तडफड रोखून त्यांना जीवदान देणाऱ्या ऑक्सिजन यंत्रांचा पुरवठा अशी अनेक समाजोपयोगी कामे या ग्रुपने केली आहेत.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. गेल्या वर्षापासून रक्तदान शिबिरे ठप्प आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. रक्त न मिळाल्याने कित्येक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
नेमकी ही बाब लक्षात घेऊन पिंगळे यांनी आपल्या ग्रुपमधील सहकारी उद्योजक सर्जेराव यादव, प्राचार्य महेश जोशी, प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्यासोबत चर्चा करून या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले.
निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. श्यामराव पाटील, रणजित मंत्री, कृष्णात पिंगळे, उद्योजक सर्जेराव यादव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, प्राचार्य महेश जोशी, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. राजारामबापू रक्तपेढी, मानस रक्तपेढी मिरज, कृष्णा ट्रस्ट रक्तपेढी कराड आणि डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढी बावडा-कोल्हापूर यांनी हे ६६२ बाटल्यांचे रक्तसंकलन केले. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी भेट दिली. पोलीस कर्मचारी संपत वारके, प्रशांत पाटील, शुभम यादव, दीपक कोठावळे, सतीश चरापले, विक्रमसिंह घाडगे, विकास राजमाने, उमेश कुरळपकर, गौतम रायगांधी, अमोल गुरव, सतीश सूर्यवंशी, डॉ. विक्रांत पाटील, प्रा. डॉ. सूरज चौगुले, डॉ. गोरख
मंद्रुपकर, डॉ. नीलम शहा उपस्थित होत्या.
फोटो :