‘स्व’ची ओळख विद्यार्थ्यांसाठी करिअरची दिशा घडवत असते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील तेज हे त्यांच्या तपश्चर्येचे फळ असते. ही तपश्चर्या विद्यार्थिदशेतच केल्यास निश्चितच भवितव्य उज्ज्वल आहे, असा आशावाद डॉ. सूरज चौगुले यांनी व्यक्त केला.
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा महाविद्यालय व बुद्धी विकास वाचनालय यांच्या वतीने तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बापूजी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘आजचा विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. बुद्धी विकास वाचनालयाचे अध्यक्ष बबन पाटील अध्यक्षस्थानी होते.
सूरज चौगुले म्हणाले, स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया ही विद्यार्थिदशेतच होत असते. पर्यावरणाच्या बाबतीत जगाशी भांडणारी व अतिरेक्यांसमोरही शिक्षणासाठी उभी राहणारी नोबेल पारितोषिक मिळविणारी मलाला युसूफ ही विद्यार्थिदशेतच घडत गेली. त्यांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला. आपले आदर्श हे आपले आई-वडील असल्यास जगातील कोणताही संघर्ष करण्यास आपण तयार राहू शकतो.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इलाही मुल्ला उपस्थित होते. प्रा. सुरेश इंगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सुवर्णा आवटी यांनी सूत्रसंचालन केले. बबन पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. के. पाटील, पर्यवेक्षक सुभाष मधाळे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो-१३कुरळप२
फोटो - ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील बापूजी व्याख्यानमालेत प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी मार्गदर्शन केले.