कोरेगाव : ‘ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातील अवघ्या पंधरा दिवसांत ४८ हजार घनमीटर गाळ काढून कोरेगाव, आसरे, कुमठे ग्रामस्थांनी इतरांसाठी प्रेरणा देणारे काम केले आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज काढले.कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील तीळगंगा नदीवर असणाऱ्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या कामाची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार स्मीता पवार, नायब तहसीलदार रवींद्र रांजणे, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, उप अभियंता बी.एस. पाटील, जनकल्याण समितीचे पंडितराव कुलकर्णी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.४00 मीटर लांबी, ८0 मीटर रुंदी आणि ३ मीटर उंची असणाऱ्या या बंधाऱ्यातील ४८ हजार घनमीटर गाळ अवघ्या पंधरा दिवसात काढण्यात आला आहे. कोरेगाव नगरपंचायत आसरे, कुमठे, जनकल्याण समिती, शरयू फौंडेशन, स्थानिक स्तर विभाग आदींच्या लोकसहभागातून हे काम सुरु आहे. या बंधाऱ्यामध्ये सध्या धोम कालव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या कालव्यामुळे कोरेगाव, कुमठे, आसरे या गावांना फायदा होणार आहे.जिल्हाधिकारी सिंघल यांनी या कामाबद्दल ग्रामस्थांचे मनापासून कौतुक करुन त्या म्हणाल्या, अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी काम सर्वांनी मिळून केले आहे. अशा पध्दतीने आपण लवकरच टंचाईवर मात करु. त्यासाठी यामध्ये सातत्य ठेवावे.
ब्रिटिशकालीन तीळगंगा तलाव अखेर गाळमुक्त
By admin | Published: June 10, 2017 12:26 AM