कुपवाड : बाजार समितीमधील सावळीच्या जागा खरेदीत आण्णासाहेब कोरे हेच खरे दलाल आहेत. सोनेरी टोळीने किती रकमेचा गोलमाल केला? याची कुंडली आमच्याकडे आहे. जमीन खरेदीचा करार आणि खरेदी एकाच दिवशी केल्यानंतर सोनेरी टोळीचे पैसे कोणाकोणाच्या खात्यावर धनादेशाने व आरटीजीएसद्वारे जमा झाले, याचे बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहे. चौकशीत यांच्या सगळ्या भानगडी बाहेर निघतील, अशी माहिती कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, बाजार समितीच्या सावळीच्या जागेत २ कोटी ४७ लाख रुपये कमिशन बुडाल्याने माझ्याकडून आरोप होत असल्याचा नवा जावईशोध कोरे यांनी लावला आहे. एवढे कमिशन देणार होता तर तुमचा ‘गॅप’ किती होता आणि शेतकऱ्याला किती पैसे देणार होता? असा प्रश्न शेगुणशे यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीमधील सोनेरी टोळीची कुंडली आमच्याकडे आहे. चौकशीत सगळ्या भानगडी बाहेर येतील, खरे चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचे शेगुणशे यांनी पत्रकारांना सांगितले.
शेगुणशे म्हणाले की, सावळी गावात शासनाची जागा असताना तलाठ्यांचा जागा नसल्याचा दाखला जोडून खरेदी केलेल्या सावळीच्या जागेतील भ्रष्टाचारामध्ये दिनकर पाटील यांच्याबरोबर आण्णासाहेब कोरेही जबाबदार आहेत. डीडीआर नीळकंठ करे यांच्याविरोधातही पणनमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांची चौकशी नीळकंठ करे यांच्याकडे पणन संचालकांनी सोपवली असून, चौकशी अधिकारी बदलीचे पत्रही पणन संचालक सोनी (पुणे) यांना दिले आहे, असे शेगुणशे यांनी सांगितले आहे.