सांगली : सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी दत्ता सुतार (वय ३५, रा. इंदिरानगर) या सेंट्रिंग कामगाराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. फारसी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर सुतार हा मृतावस्थेत पडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे गुरूवारपासून सांगली जिल्हा दौऱ्यावर आहे. दुपारी ते शहर उपअधीक्षक कार्यालयात आले होते. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर उपविभागातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. तेवढ्यात सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर खून झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले. तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती.गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरूवात केली. मृत सुतार हा रस्त्यावरच पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर वार झाले होते. बाजूलाच एक कोयता व चाकू पडला होता. या दोन्ही शस्त्रांना रक्त लागले नव्हते. त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्याच हत्यारांनी खून केल्याचे दिसून येत होते. बाजूलाच सुतार याची दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) पडली होती. सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे सुरूवातीला ओळख पटली नाही. तपासात त्याचे नाव दत्ता सुतार असून तो सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. खून झाला त्या परिसरात कोठे सीसीटीव्ही फुटेज आहे काय? तपासले जात आहे. तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीने वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली.
सांगलीवाडीजवळ भरदिवसा कामगाराचा निर्घृण खून, संशयितांचा शोध सुरु
By घनशाम नवाथे | Updated: February 20, 2025 16:25 IST