सांगली : शहरातील जामवाडीमध्ये अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २२, रा. जामवाडी, सांगली) या तरुणाची कोयत्याचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मरगूबाई मंदिराजवळ दुपारी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत पाच संशयितांना ताब्यात घेतले. हल्लेखाेरांनी किरकोळ वादातून अनिकेतला संपविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अनिकेत एका वित्तसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका मंडळातही सक्रिय होता. परिसरात काही महिन्यांपूर्वी काही मुलांशी किरकोळ कारणातून त्याचा वाद झाला होता. त्यावेळी अनिकेतने एका मुलाला थप्पड मारली होती. त्यामुळे ही मुले अनिकेतवर चिडून होती.मंगळवारी (दि. २७) दुपारी पाच वाजेच्या सुमारास तो मरगूबाई मंदिराजवळून व्यायामशाळेकडे निघाला होता. त्यावेळी ही मुले तेथे आली. पूर्वी झालेल्या वादाचा जाब अनिकेतला विचारला. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. पाचही जणांनी त्याला घेरले. अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले. वार वर्मी बसल्याने अनिकेत जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.
हल्ल्याची माहिती मिळताच उपाधीक्षक जाधव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथकांनी मोहीम सुरू केली. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वान तेजा याने जामवाडी ते कर्नाळ रस्त्यापर्यंत माग काढला. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळाल्याचे निष्पन्न झाले. काही वेळातच पाचही संशयित पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात सुरू होते.
भरवस्तीत दिवसाढवळ्या खूनजामवाडीतील हा परिसर वर्दळीचा आहे. तेथे भरदिवसा आणि भरवस्तीत खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. खुनानंतर काही मिनिटांतच मरगूबाई मंदिराचा परिसर निर्मनुष्य झाला.
अनिकेत कबड्डीपटूअनिकेतच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो जामवाडीत आजी, आत्या व भावासोबत राहत होता. तो चांगला कबड्डीपटू होता. त्याने जिल्हा संघातून कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा संशयितांसोबत वाद झाला होता. त्याची खुन्नस त्यांनी आज काढली.
दबा धरून हल्लामंगळवारी पाचच्या सुमारास अनिकेत व्यायामशाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी मरगूबाई मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला घेरले. कोयत्याचे सपासप वार केले. त्याच्या डोक्यात पाच, तर पाठीवर सहा वार झाले. वार खोलवर झाल्याने दोन्ही कोयते त्याच्या शरीरातच अडकून पडले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून संशयितांनी पळ काढला. मृतदेहाशेजारी त्याचा मोबाइल, व्यायामाची बॅग, चप्पल पडली होती. अनिकेतचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.