अथणी : अथणी तालुक्यातील कोडगानूर रस्त्यावर असणाऱ्या शेतात राहणाऱ्या चंद्रव्वा आप्पाराय इचारी (वय ६५) व मुलगा विठ्ठल आप्पाराय इचारी (वय ४२, मूळ रा. नंदगाव) या मायलेकाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दुहेरी खुनामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ऐगळी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रव्वा इचारी व मुलगा विठ्ठल इचारी हे मूळचे नंदगावचे असून, एक विवाहित मुलगी आहे. तर मुलगा बाहेरगावी आश्रमात असतो. त्यामुळे आई आणि तो दोघेच शेतातील घरात राहत होते. चंद्रव्वा यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी सुरू होती.दरम्यान, रविवारी सायंकाळी चंद्रव्वा आणि मुलगा विठ्ठल या दोघांचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली. मायलेकाच्या खुनाची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी, मंडल पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, कुमार हडकर, शिवानंद नागनुर आदींचे पथक दाखल झाले. आजूबाजूला सर्वत्र माहिती घेतली. मृताच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली. याबाबत ऐगळी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद केला आहे.खुनाचे नेमके कारण काय?मायलेकाचा निर्घृण खून करण्यामागे नेमके कारण काय? याची घटनास्थळी चर्चा रंगली होती. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून की अन्य कारणातून याचीही चर्चा सुरू आहे. ऐगळी पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
Sangli: अथणी तालुक्यात आई, मुलाचा निर्घृण खून; नेमकं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:27 IST