सांगली/कडेगाव : बीएसएफमध्ये कार्यरत असलेले खेराडे (वांगी) तालुका येथील जवान लक्ष्मण गणेश सूर्यवंशी (वय ३०) यांचे गुजरात राज्यातील कच्छ भुज येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवार (दि.१२ )रोजी खेराडे वांगी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत फैरी झाडून त्याना मानवंदना दिली.
लक्ष्मण सूर्यवंशी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. शनिवारी कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव रविवारी कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथे त्यांच्या मूळगावी पोहोचल्यावर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सैन्य दलाच्या जवानांनी सन्मानार्थ बंदुकीतून हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. कडेगावचे प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे आदीसह ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले व अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व मुलगा व मुलगी, भाऊ असा परिवार आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सूर्यवंशी परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.