संतोष भिसेसांगली : कोरोनाच्या आगीतून सुटलेले रुग्ण म्युकरमायकोसीसच्या फुफाट्यात सापडू लागले आहेत. महागड्या अौषधोपचारांमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरु आहे. उपचारांसाठीचे लाखो रुपये कसे उभे करायचे असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे.मणेराजुरी येथील रमेश भोसले या गरीब शेतकऱ्यावर कोसळलेले संकट म्युकरमायकोसीसच्या वेदना स्पष्ट करण्यासाठी पुरेसे ठरले आहे. चार-पाच एकर शेतीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या भोसले यांची परिस्थिती जेमतेमच आहे. तीन आठवड्यांपूर्वी लहान भावाला कोरोनाचा संसर्ग झाला.
लक्षणे तीव्र नव्हती, शिवाय ऑक्सिजनही ९० पेक्षा अधिक होता. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले. एक रुपयांचाही खर्च न करता कोरोनामुक्त झाले. पण त्यानंतर दोन-तीन दिवसांतच म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसू लागली.भोसले कुटुंबासाठी हा आजार म्हणजे आगीतून सुटल्यानंतर फुफाट्यात पडण्यासारखा ठरला. कोरोनादरम्यान पैशाची अजिबात तोशीस न लागलेल्या भोसले यांची म्युकरमायकोसीसमुळे मात्र फरपट सुरु झाली. भावाला भारती रुग्णालयात दाखल केले. तेथे मोफत उपचारांसाठी महात्मा फुले योजनेचा दिलासा मिळाला.
इंजेक्शन्स मात्र विकत आणण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांकडून चिठ्ठ्या मिळताच रमेश भोसले यांची धावाधाव सुरु झाली. इंजेक्शन्स जिल्हा परिषदेत मिळतात असे त्यांना सांगण्यात आले. सांगली शहराची पुरेशी माहिती नसतानाही त्यांनी जिल्हा परिषद गाठली.वयाच्या साठीतला हा शेतकरी डोक्याला मुंडासे, तोंडावर टॉवेल लपेटून इंजेक्शनच्या रांगेत उभा राहिला. एकावेळी दोन इंजेक्शन्स घ्यायची होती, त्यांची किंमत ५ हजार ८०० रुपये होती. जेमतेम परिस्थिती असणाऱ्या भोसले यांच्यासाठी ही रक्कम खुपच मोठी होती.
एका कापडी पिशवीत १००, ५०० च्या नोटा घेऊन इंजेक्शनसाठी धडपड सुरु होती. कोरोनातून बाहेर आलेल्या भावाला म्युकरमायकोसीसच्या तावडीतून सोडवायचे होते. इंजेक्शन्सची सोमवारची गरज भागली, पण डॉक्टरांकडून आणखी किती चिठ्ठ्या येतील याचा नेम नव्हता. बेसुमार खर्चामुळे मेटाकुटीला आलेले असे अनेक नातलग जिल्हा परिषदेत सोमवारी पहायला मिळाले.
क्रीडा संकुलात एक रुपयादेखील न देता कोरोनाचे उपचार मिळाले, भाऊ बरा झाला. आता या नव्या आजारासाठी पैसा उभा करावा लागत आहे. आमच्यासाठी ही रक्कम आवाक्याबाहेरची आहे. शेतीवर कसेबसे घर चालते. नव्या आजारासाठी किती इंजेक्शन्स द्यावी लागतील याचा नेम नाही. त्यामुळे भिती वाटत आहे.- रमेश भोसले,रुग्णाचा भाऊ, मणेराजुरी.