सांगली : पेठ, बुधगाव आणि सलगरे ग्रामपंचायतींच्या कामकाजातील अनियमिततेसंदर्भात जिल्हा परिषदेत मंगळवारी सुनावणी झाली. सलगरे ग्रामपंचायतीने सुमारे ४०० पानांचे म्हणणे सादर केले, तर पेठ व बुधगाव ग्रामपंचायतींनी मुदत मागून घेतली.
या ग्रामपंचायतींना अनियमिततेमुळे जिल्हा परिषदेने अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. पेठ ग्रामपंचायतीच्या अनियमिततेविषयी समितीमार्फत चौकशीही झाली आहे. सलगरे ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी ३२ टक्क्यांच्या आत असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या भेटीत आढळले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगली तलवार होती.
बुधगावमध्येही घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत बरखास्तीची कार्यवाही सुरू आहे. प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यापूर्वी ग्रामपंचायतींचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. सलगरे ग्रामपंचायतीने कायदेशीर तरतुदींचा आधार घेत सविस्तर म्हणणे सीईओ जितेंद्र डुडी यांच्यापुढे सादर केले, तर पेठ व बुधगाव ग्रामपंचायतींनी म्हणणे सादर करण्यासाठी पुढील मुदत मागून घेतली.
..........................................