लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : बुधगाव (ता. मिरज) येथील पूर्ण झालेली पेयजल योजना केवळ वीज महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणाने कार्यान्वित होण्यात अडथळा निर्माण झाल्याने योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला गाव अद्याप तहानलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ संतप्त आहेत. योजनेचा तातडीने वीजपुरवठा न जोडल्यास वीज महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य विक्रम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
बुधगावसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून चार कोटींहून अधिक खर्चाची नवीन पेयजल योजना पूर्ण झाली आहे. वीजजोडणीचे काम बाकी आहे. वीजजोडणीसाठी खासदार संजय काका पाटील यांनी वेगळ्या निधीची तरतूद केली आहे. यातून योजनेच्या वीजपुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र वीज महावितरण अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे योजनेचा वीजपुरवठा जोडला जात नसल्याने पूर्ण झालेली पाणी योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. वीस वर्षांनंतर योजनेचे पाणी मिळेल या अपेक्षेने ग्रामस्थांचे योजनेकडे लक्ष लागून आहे. मात्र. महावितरणचे अधिकारी जुन्या कालबाह्य योजनेच्या थकीत बिलाचे कारण पुढे करून योजनेचा वीजपुरवठा जोडत नसल्याने अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणाने योजना पूर्ण होऊनही गाव पाण्याअभावी तहानलेला आहे. महावितरणच्या अडवणुकीच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त आहेत. योजनेचा तातडीने वीजपुरवठा न जोडल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य विक्रम पाटील यांच्यासह मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजित गावडे, रोहित पाटील, सिद्धार्थ जाधव, विशाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
चौकट
आमदार व खासदार लक्ष देणार का : पाटील
कालबाह्य झालेल्या सात गावच्या पाणी योजनेच्या थकबाकीचा मुद्दा पुढे करून महावितरणचे अधिकारी नव्या पाणी योजनेचा वीजपुरवठा जोडण्यास नकार देऊन केवळ एका गावास वेठीस धरत आहेत हे चुकीचे आहे. सध्या गावात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर असल्याने खासदार संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांनी लक्ष घालून वीजजोडणीचा प्रश्न सोडवून योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील यांनी केली आहे.