बुधगाव येथे जुनी पाणी योजना कालबाह्य झाल्याने साडेचार कोटींची नवीन पाणी योजना पूर्ण झाली आहे. मात्र, वीजपुरवठा जोडणीअभावी ती रखडली होती. पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील व ग्रामस्थांनी वीज पुरवठ्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. महावितरणने सात गावच्या योजनेची थकबाकी भरल्यानंतर वीज जोडण्याची भूमिका घेतल्याने योजना सुरू होण्यात अडचण होती. विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा विषय खा. संजयकाका पाटील व आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे मांडला. अडवणुकीबाबत तक्रार करीत वीज जोडून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. याची दखल घेत खा. पाटील, आ. गाडगीळ यांनी तोडगा काढल्याने महावितरणने वीजपुरवठा जोडला. रखडलेली योजना कार्यान्वित झाल्याने बुधगावचे पाण्यासाठीचे हाल थांबल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
बुधगावची नवीन पाणी योजना कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:25 AM