देवराष्ट्रे : म्हैस व गाय दूध दरात वारंवार होणाऱ्या चढ-उताराने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशावेळी वाढत्या उन्हाळ्यात म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत, ११ मेपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाय दुधात प्रति लिटर एक रुपयाने, तर म्हैस दुधात प्रति लिटर १.३० रुपयांची वाढ करीत दिलासा दिला आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात म्हैस दूध दरात दोन ते तीन रुपयांची वाढ होते. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही म्हैस व गाय दूध दरात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही.गाय दुधाच्या दरात स्थिरता नसल्याने शेतकरी म्हैस पालनाकडे वळताना दिसत आहेत. म्हैशीचा भाकड काळ जास्त असल्याने म्हैसपालनही आजच्या महागाईमुळे परवडत नाही. तरी गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधासही अनुदान मिळावे, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.गेल्या दहा महिन्यांनंतर म्हैस दूध उत्पादकांना संघांनी दिलासा दिला आहे. आता शेतकऱ्यांना ६.५ फॅटसाठी ३९ रुपये, तर १० फॅटसाठी ५२ रुपये दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. तसेच गाय दूध उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रति लिटर २३ रुपये दर मिळणार आहे. ही दरवाढ ११ मेपासूनच्या दूध बिलाबरोबर मिळणार आहे.दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. एका बाजूला खाद्यांच्या किमती वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चारा विकत घेऊन जनावरे जगवली जात आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दूध व्यवसायातील अडचणींवर मार्ग काढण्याची वेळ आली आहे. दराची अनिंश्चितता हे यापुढे मोठे आव्हान असणार आहे. शासकीय पातळीवर यासंदर्भात योग्य धोरण निश्चित करण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे.