डफळापूर : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना, बाज हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञातांनी बिळूर कालवा पुन्हा फोडला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे ओढापात्रावरील जलसेतूचा भराव वाहून गेल्याने जलसेतूला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असून कारवाई केली जात नसल्याने, वारंवार कालवा फोडणारी मंडळी उजळमाथ्याने वावरत आहेत.
डफळापूर येथील शेतकºयांनी तीन महिने झाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे म्हणून प्रशासनाकडे साडेसहा लाख रुपये भरले. मागील आठवड्यात बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडणे सुरु केले. सध्या डफळापूर तलाव चाळीस टक्के भरला आहे. डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना मंगळवारी रात्री बाज गावालगत ओढापात्रावरील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्याच्या जलसेतूलगत कालवा फोडण्यात आला. कालव्यातील लाखो लिटर पाणी ओढापात्रातून दोन दिवसात भोकरचौडी तलावाकडे वाहून गेले. कालवा जलसेतूला घासून फोडण्यात आल्याने जलसेतूचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने ओढापात्रावरील जलसेतूला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवस झाले कालव्यातून पाणी सुरुच आहे. संबंधित अधिकारी मंडळींनी कालवा फोडणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला नाही. तसेच फोडलेला कालवा दुरुस्त केला नाही. मागील दोन महिन्यापासून बाज गावाच्या हद्दीत तीनवेळा कालवा फोडण्यात आला. परंतु अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, याबद्दल परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.