लाेकमत न्यूज नेटवर्क
मांगले
: मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातून खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे शेतीला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात प्रतिवर्षी पाण्याअभावी पिके वाळून जातात. त्यामुळे शिंगटेवाडी व चिखलवाडीनजीक मोरणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी शिंगटेवाडी व चिखलवाडी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.
शिराळ्यानजीकच्या मोरणा मध्यम प्रकल्पातून मोरणा नदीकाठावरील शेतीला पाणी उपलब्ध होते. या पाण्यावरती शिराळा, तडवळे, उपवळे, पाडळी, बिऊर, भाटशिरगाव, जांभळेवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी, मांगलेपर्यंतच्या शेतीला पाणी उपलब्ध होते.
दरम्यान, मोरणा नदीचे पात्र हे तीव्र उताराचे व अरुंद पात्र आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी अडवले जाते. मात्र, नदीवरील बंधाऱ्याची संख्या पुरेशी नाही. शिंगटेवाडीच्या वरील भागात धुमाळवाडी-कुरणे वस्तीदरम्यान मोरणा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यानंतर शिंगटेवाडी, चिखलवाडी या गावांच्या लगत जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरादरम्यान मोरणा नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बंधारा नाही. खाली मांगले हद्दीतील नावडोह बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. ते अडवलेले पाणी चिखलवाडी, शिंगटेवाडी, जांभळेवाडी शिवारातील नदीपात्रात पोहोचत नाही. त्यामुळे या शिवारातीत शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात पिके जगवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात. त्यातूनही पुरेसे पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.
मोरणा पाटबंधारे विभाग उन्हाळ्यात नदीपात्रात सात दिवस पाणी सोडते व आठ दिवस पाणी बंद ठेवते. हे सोडलेले पाणी शिंगटेवाडीच्या वरील शिवारात उपसा झाल्यामुळे बऱ्याच वेळा खालील शिवारात पोहोचत नाही. जादा क्षमतेने पाणी सोडले तरच पाणी मांगले शिवारातील नावडोह व सरकार बाग बंधाऱ्यापर्यंत पोहोचते. दरम्यान, शिंगटेवाडी, चिखलवाडी दरम्यानचे नदीपात्र तीव्र उताराचे आहे. त्याचबरोबर या दरम्यान बंधारा नसल्याने मोरणा नदीपात्रातून पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरातील नदीपात्र सततच कोरडे ठणठणीत पडलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक उन्हाळ्यात नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात व त्या खोदलेल्या खड्डयातील पाणी शेतीला उपसावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्याचबरोबर कायमच या परिसरातील शेतीला अपुरे पाणी पडत असते. त्यामुळे पिके वाळून जाऊन शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागते.
दरम्यान, पाटबंधारे विभागाकडे शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांनी बंधारा बांधण्याची मागणी अनेक वेळा केली आहे; परंतु त्याची कार्यवाही झालेली नाही. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांची मोरणा नदीवर शिंगटेवाडी व चिखलवाडी शिवारात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी पूर्ण करून शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
फोटो : २७ मांगले १
ओळ : शिंगटेवाडी, चिखलवाडी शिवारातील मोरणा नदीचे पात्र बंधाऱ्याअभावी पाणीसाठा होत नसल्याने असे कोरडे ठणठणीत पडलेले असते.