लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विश्रामबाग परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात मोठ्या गृहप्रकल्पांच्या वाढत्या संख्येमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विश्रामबाग परिसरात पाण्याची नवीन टाकी बांधावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ॲड. अमित शिंदे यांनी आयुक्त व महापौरांकडे केली.
याबाबत शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या तीन ते चार वॉर्डांमध्ये विश्रामबागचा परिसर वसलेला आहे. या परिसरात एकच पाण्याची टाकी आहे. परिसर वेगाने विस्तार होत असून या भागात लोकवस्तीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अपार्टमेंटचे मोठे प्रकल्प उभारले जात आहे. दिवसातून दोनच तास अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. नवीन पाणीकनेक्शनसाठी सर्वाधिक अर्ज विश्रामबाग परिसरातून केले जात आहेत. भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. विश्रामबागमध्ये महापालिकेचे अनेक खुले भूखंड आहेत. ८० फुटी रोड, धामणी रोड, शंभर फुटी रोड या ठिकाणच्या खुल्या भूखंडावर नवीन पाण्याची टाकी उभारल्यास हा प्रश्न निकाली निघेल.
यावेळी सुभाष तोडकर, सुधीर भोसले, दत्ता पाटील, सुरेश मुत्तलगिरी उपस्थित होते.