सांगली : जिल्ह्यातील सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्याची मागणी रुग्ण साहाय्य समितीचे सतीश साखळकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत साखळकर म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयाला ऑक्सिजन कमी पडत आहे. भविष्यात तिसरी, चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही ऑक्सिजन निर्मितीचे प्लॅन्ट उभे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी सर्व उपजिल्हा रुग्णालये, तालुका रुग्णालय, सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट तात्काळ उभे करण्यात यावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह प्रत्येक आमदारांचा एक कोटी रुपयांचा निधी वापरता येऊ शकतो. त्यामुळे आमदार, खासदारांनी प्रयत्न केल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रकल्प उभा राहू शकेल, असेही साखळकर म्हणाले.