विकास शहाशिराळा-शिराळा तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ३९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली रक्त साठवणूक केंद्राची ( ब्लड स्टोरेज युनिट) इमारत धूळ खात पडली असून याचा उपयोग काही अधिकारी , कर्मचारी वर्ग मुक्कामासाठी करत आहेत. या इमारतीच्या आवारातच कालबाह्य औषधे तशीच फेकण्यात आली आहेत. हे केंद्र सुरू झाल्यास तालुक्यातील शासकीय, खाजगी रुग्णालयातील रुग्णांची सोय होणार आहे.हा तालुका डोंगरी तालुका आहे काही गावांतील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी चालतही जावे लागते तसेच कराड, कोल्हापूर, सांगली , मिरज , इस्लामपूर येथे जावे लागते. या बाबींचा विचार करून आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, दिवंगत माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव नाईक यांनी तालुक्यात नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्रे तसेच शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय, कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आली आहेत.काही रुग्णांना रक्ताची आवश्यकता लागते, त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना इस्लामपूर, कराड, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी जावे लागते. यामुळे नाहक त्रास आणि आर्थिक फटकाही सोसावा लागतो. याचा विचार करून ग्रामीण रूग्णालयाजवळच असणाऱ्या क्वार्टर मधेच ३९ लाख रुपये खर्चून सर्व सोईंनी युक्त अशी एक भव्य अशी ही इमारत बांधण्यात आली आहे.मात्र ही इमारत धूळ खात पडली आहे.या इमारतीचे प्रवेशाचे लोखंडी चक्री दरवाजा काढून बाजूला ठेवला आहे. जनरेटर हे लहान मूलांचे खेळण्याचे साधन बनले आहे. या इमारतीत वातानुकूलित व्यवस्था असल्याने चक्क काहीजण मुक्कामासाठीही येथे रहात असल्याची चर्चा आहे.या आवारातच दरवाज्याच्या जवळ कालबाह्य झालेली इंजेक्शन तशीच टाकण्यात आली आहेत, त्याचबरोबर बाटल्या, औषधे आदीही टाकण्यात आली आहेत. त्यामुळे येथे खेळत असलेल्या बालकांचा जीव धोक्यात येण्याची ही शक्यता आहे.१) Diclofenac ही मार्च २०२० रोजी कालबाह्य झालेली इंजेक्शन याठिकाणी मोठ्या प्रमाणात फेकून देण्यात आली आहेत या औषधांना कालबाह्य होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.तसेच काही औषधे अर्धवट जळालेल्या अवस्थेत तशीच शिल्लक आहेत.२) जर या केंद्राला परवानगीच मिळाली नसेल तर ही इमारत का बांधली गेली ? विनापरवाना इमारत बांधून आरोग्य विभागाने काय साध्य केले ? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ , बालरोगतज्ज्ञ आहेत तसेच शासन निर्णय नुसार खाजगी भुलतज्ञ यांची नेमणूक करू शकतात.
या केंद्रासाठी लागणारी प्रथम संदर्भ सेवा केंद्राची( ऋफव) मान्यता अद्याप मिळालेली नाही.ही मान्यता मिळाल्यावर यासाठी स्त्री रोग तज्ञ , बालरोगतज्ज्ञ , भुलतज्ञ यांची नेमणूक करण्यात येते त्यानंतर हे केंद्र सुरू केले जाईल.यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.- डॉ. संजय साळुंखेजिल्हा शल्यचिकित्सक