अविनाश कोळी ।सांगली : जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सराफ व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असला तरी, ग्राहकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. एकल दुकाने सुरू होताच खरेदीसाठी गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. आता सराफ पेठा सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ज्वेलर्सची दुकाने दोन महिने बंद असल्याने सुमारे दीडशे कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडव्याचा मुहूर्त निघून गेला. अक्षय तृतीयेपासून काही मोठ्या ज्वेलर्सनी आॅनलाईन सोने व दागिन्यांच्या विक्रीची सोय केली होती. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला, मात्र बहुतांशी सोने खरेदी गुंतवणुकीसाठी होती. आॅनलाईन दागिने खरेदीचे प्रमाण कमीच होते. दुकानात जाऊन हाताळून, निरीक्षण करून खरेदी करण्याची ग्राहकांना सवय आहे. त्यामुळे एकल दुकाने सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी झाली. ग्रामीण भागातही तसाच प्रतिसाद मिळाला. शहरातील सराफ पेठा बंद असल्यामुळे त्या सुरू होण्याची ग्राहकांना आणि व्यावसायिकांना प्रतीक्षा होती. जिल्हा प्रशासनाने सम-विषम तारखेनुसार पेठा सुरू करण्यास परवानगी दिल्याने हा व्यवसाय आता पूर्वपदावर येणार आहे.
सांगली शहरात गेले पंधरा दिवस मोजकीच चार-पाच दुकाने सुरू होती. तेथे दागिन्यांच्या खरेदीसाठी किंवा जुने दागिने देऊन नवे घेण्यासाठी गर्दी दिसत होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह होत असले तरी, ते दागिन्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. काहींनी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शुद्ध दागिन्यांची आॅनलाईन व प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी सुरू केली आहे. बंद असलेल्या काही दुकानांनी आॅनलाईन खरेदी प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकांना दुकाने उघडल्यानंतर डिलिव्हरी देण्याचे नियोजन केले आहे. सध्या घरपोहोच डिलिव्हरीची सोय नाही. त्यामुळे खरेदीसाठी लोकांना प्रत्यक्ष दुकानात जावे लागत आहे.
हॉलमार्कच्या नियमांची चिंता
सध्या हॉलमार्कच्या नियमांचे पालन करताना अडचणी येत आहेत. यातच बीआयएस मानांकनात १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा अधिक आहे. तो १५ जानेवारी २०२१ पर्यंत संपविण्याची मुदत आहे. तरीही हॉलमार्कच्या अन्य अनेक नियमांचे अडथळे या व्यवसायात येत आहेत.
दागिन्यांसाठी आजही दुकानेच पहिली पसंतीजिल्ह्यातील बहुतांश सराफ दुकाने बाजारपेठांमध्ये आहेत. एकल दुकानांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही मोजकीच दुकाने सुरू होती. अद्याप आपल्याकडे आॅनलाईन दागिने खरेदीला पसंती मिळत नाही. प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिने हाताळून ते खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. केवळ शुद्ध सोने खरेदी करायचे असेल तर आॅनलाईनचा पर्याय चांगला आहे. मात्र दागिन्यांसाठी आजही दुकानेच ग्राहकांची पहिली पसंती आहेत.
- किशोर पंडित, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ, सुवर्णकार फेडरेशन