फाेटाे : २००८२०२१ आटपाडी २ : वाक्षेवाडी (ता. आटपाडी) येथे शनिवारी बैलगाडी शर्यतीसाठी जमलेल्या जमावासमोर आमदार गाेपीचंद पडळकर यांनी भाषण केले.
लाेकमत न्युज नेटवर्क
आटपाडी : सर्वाेच्च न्यायालयाची बंदी व प्रशासनाचा विराेध झुगारून झरे (ता. आटपाडी) गावाजवळ वाक्षेवाडी-निंबवडेदरम्यानच्या माळावर शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान बैलगाडी शर्यती झाल्या. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयाेजन केले हाेते. ऐनवेळी शर्यतीचे ठिकाण बदलून शर्यती घेतल्याने पाेलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.
मोठा पोलीस बंदोबस्त आणि कोणत्याही परिस्थितीत शर्यती होऊ न देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे काय हाेणार याकडे राज्याचे लक्ष लागले हाेते. पडळकर यांच्या समर्थकांनी रात्रभर जागून केलेल्या नव्या मैदानावर बैलगाड्या धावल्या.
झरे येथे भाजपचे आमदार पडळकर यांनी जाहीर केलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती गेल्या आठवड्यापासून परिसरासह राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. या शर्यतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शाैकीन आणि बैलगाडीचालकांना बाेलावण्यात आले होते. बैलगाडी शर्यतींवर सर्वाेच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. शिवाय सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शर्यती रोखण्याची तयारी केली होती. मोठा बंदोबस्त ठेवला होता. झरेसह नऊ गावांमध्ये दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. नियोजित मैदानावर पोलिसांनी चरी पाडल्याने आणि परिसराला वेढा दिल्याने तेथे शर्यत होणे अशक्य होते. गुरुवारी सायंकाळपासूनच या परिसरात कोणालाही येण्यास पोलीस मज्जाव करत होते. कसून चौकशी केल्यानंतरच या गावांमध्ये सोडले जात होते. पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पाेलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्यासह हजारभर पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात हाेता.
दरम्यान, वाक्षेवाडीच्या माळावर शुक्रवारी पहाटेपासूनच गर्दी जमू लागली. तेथे शर्यतींचे मैदान तयार करण्यात आले होते. सकाळी सहाच्या दरम्यान सात बैलगाड्या धावल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने शौकीन उपस्थित होते. शर्यतीनंतर आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शर्यतीच्या ठिकाणी भेट दिली. समर्थकांना शांततेचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पंधरा दिवसांत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अचानक शर्यतीचे ठिकाण बदलल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. शर्यती झाल्या तेव्हा तेथे एकही पोलीस हजर नव्हता. मात्र नंतर पोलिसांनी येऊन जमाव पांगविला.
चौकट
शर्यतीचा मागमूस पोलिसांना कसा लागला नाही?
जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्या नेतृत्वाखाली तब्बल हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शर्यत होऊ नये यासाठी काळजी घेत होता. मात्र, पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यावर आणि केवळ एका मैदानावरच लक्ष केंद्रित केले. प्रतीकात्मक इशारा म्हणून ही शर्यत भरविण्यात येणार असल्याने ती कोठेही होणे शक्य होते. पोलीस बंदोबस्त असलेल्या झरे परिसरातून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर झालेल्या या शर्यतीचा मागमूस पोलिसांना शर्यत पूर्ण होईपर्यंत लागला नाही. तथापि परिसरात एवढा मोठा बंदोबस्त असताना आणि हजारो शौकीन, गाड्या शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असताना पोलिसांच्या गुप्त यंत्रणेला कसे कळले नाही, याची चर्चा सुरू आहे.
कोट
प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन आपण झरे येथील नियोजित मैदानात बैलगाड्यांची शर्यत घेतली नाही. मात्र, शेतकऱ्यांनी वाक्षेवाडी येथे शर्यत करून सरकारला इशारा दिला आहे. सरकारने या संदेशाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा यापुढे बैलगाडी शर्यत सुरू होण्यासाठी मोठे आंदोलन करू.
- गोपीचंद पडळकर, आमदार