कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा पर्याय पुढे आणल्यानंतर सर्वच शाळांनी विविध पातळीवर तयारी करून गेले वर्षभर यंत्रणा राबविली. मोबाइल व इतर साधनांद्वारे विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. शाळांचे ऑनलाइन वर्ग, अभ्यासाचे व्हिडिओ, पीडीएफ स्वरुपातील पुस्तके, अभ्यास संच, युट्यूब चॅनल्स, पालकांचे वॉट्स् ॲप ग्रुप, झुम कॉल, गुगल मीट असे अनेकविध पर्याय हाताळून शाळांनी विद्यार्थांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला. आजवरच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने संपूर्ण वर्षभर ऑनलाइन अभ्यास घेतला गेला.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पालकवर्गाची मात्र माेठी दमछाक झाली. सर्वच पालकांना मुलांच्या ऑॅनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफाेन उपलब्ध करून देणे शक्य नव्हते. तरीही अनेक पालकांनी अगदी कर्ज काढून मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी केले. आपले मूल ऑनलाईनच्या स्पर्धेत मागे राहू नये यासाठी पालक धडपडताना दिसले.
वर्षभर घरातच अडकून पडलेल्या मुलांचा मूड सांभाळत त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्याची कसरत पालकांना करावी लागली. ऑनलाइन वर्गाच्या वेळा सांभाळत शिक्षकांनी दिलेला अभ्यास मुलांकडून करून घेतानाही त्यांची दमछाक झाली. बरेचदा विषयाचे नीट आकलन न झाल्यामुळे पाठांतरावर भर दिला जातो त्यामुळे अपयशाची शक्यता वाढते. अभ्यासाचे तंत्र शिकून घेतल्यास ही अडचण येत नाही. याची जाणीव आता पालकांनाही हाेऊ लागली आहे.
प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण हा परिपूर्ण पर्याय नाही. त्यामुळे त्याचा वापर गरजेनुसारच करावा, याबाबत अजिबात दुमत नाही. म्हणूनच ऑनलाइन शिक्षण देताना अभ्यासाचा ताण पडून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडणार नाही, याची काळजी घेण्यावर भर देण्यात आला. म्हणूनच देशभरात पहिल्यांदाच व्यापरीरित्या राबविलेला ऑनलाइन शिक्षणाचा प्रयाेग कमालीचा यशस्वी ठरला.
काेट
शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण हे पर्याय नाही. परंतु काेराेनासारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये ऑनलाइन वर्ग निश्चितच उपयुक्त ठरले. यामध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची राहिली. शाळेत असताना आम्ही मुलांकडून अभ्यास करून घेताे. पण ऑनलाइन वर्गात ते शक्य नव्हते. पालकांनीही शिक्षकांच्या बराेबरीने जबाबदारी स्वीकारल्याने ऑनलाइन ज्ञानदानाचा उपक्रम यशस्वी ठरला.
- राजेंद्र माळी
कांतीलाल शहा प्रशाला, सांगली