सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी, जबरी चोऱ्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. युवराज ऊर्फ शंकर ईश्वरा माने (वय १९, रा. बेळंकी, ता.मिरज) असे संशयिताचे नाव असून त्याने तालुक्यातील आठ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील घरफोडी, चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी एक पथक तयार केले. पथक गुन्ह्यांची माहिती घेत असताना, पथकातील विकास भोसले यांना बेळंकी येथे एक संशयित दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहा. निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्यासह पथकाने तेथे जाऊन त्यास जागीच पकडले.
त्याच्याकडून माहिती घेतली असता, एरंडोली येथील विशाल काळे याची दुचाकी असून यावरून ठिकठिकाणी चोऱ्या केल्याचे सांगितले. ढवळी येथे सोन्याचे मंगळसूत्र, मनगट्या, लिंगनूर येथून सतरंजी, स्पीकर, बेडग रोडवरून कोंबड्या, मालगाव येथून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून स्पीकर, मल्लेवाडी येथील दोन दुकानातून रोकड, गुंडेवाडी येथील पाच दुकाने फोडून रोकड, बेळंकी येथील तलाठी कार्यालयातून रोकड, मिरज-पंढरपूर रोडवरील एका मळ्यातील महिलेचे दागिने असा चोरी केलेला माल व दुचाकी असा एक लाख ८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज फडणीस, अभिजित सावंत, सुधीर गोरे, संजय कांबळे, शशिकांत जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.