कोकरुड : शिराळा-चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटरचे मालक जयंतीलाल ओसवाल यांचे दुकानाजवळ असलेले घर फाेडून ५ लाखाची चोरी झाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत कोकरुड पोलिसात नाेंद झाली आहे.
फिर्यादी जयंतीलाल रामलाल ओसवाल (वय ४१) यांचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी अंबिका स्टील नावाचे दुकान आहे. तेथून ते सळई, सिमेंट, फरशी यासह विविध प्रकारचे बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत. तेथे ते लहान भावासह, पत्नी, दोन मुलांसह दुकानाच्या शेजारीच राहतात. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते दुकान बंद करून कुटुंबीयांसह जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. जेवण करून दहाच्या सुमारास परत आले असता, घराच्या दरवाजाच्या शटरचे कुलूप तोडले असल्याचे दिसले. आत जाऊन पाहिले असता, घरातील तिजोरीमधील रोख रक्कम ५ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे उघड झाले.
मंगळवारी पहाटे जयंतीलाल ओसवाल यांनी याबाबतची तक्रार कोकरुड पोलिसात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत.
दरम्यान, बुधवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत तपासासाठी मार्गदर्शन केले.