वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे लिधडे मळा शेजारील दीड एकरातील ऊस शॉर्टसर्किटने आग लागून खाक झाला. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
वाटेगाव येथे लिधले मळा येथून वाटेगावकडून पुदेवाडीकडे ११ केव्ही मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनीमध्ये गुरुवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना कळताच नागरिकांनी महावितरण कार्यालयात माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आगाची माहिती समजताच विद्युत पुरवठा बंद केला. नागरिकांनी मोठ्या शिताफीने ही आग विझविली. मात्र, तोपर्यंत दीड एकरातील ऊस जळून खाक झाला होता. यात मिलिंद दुकाने यांचा २० गुंठे ऊस व ठिबक सिंचनचे साहित्य, मधुकर अनंत मुळीक यांचे २४ गुंठे, दिलीप नारायण मुळीक, महिपती अण्णा मुळीक, पांडुरंग अण्णा मुळीक या शेतकऱ्यांचा ऊस जळून नुकसान झाले आहे. घटनास्थळाला भेट देऊन तलाठी जगन्नाथ कदम यांनी पंचनामा केला.