सांगली : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी सांगलीत भाजप महिला मोर्चाच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने करण्यात आली.आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन करण्यात आले. शंखध्वनी व निदर्शने करण्यात आली.यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे म्हणाल्या की, झारखंडचे काँग्रेसचे खासदार साहू यांच्याकडे तिनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली आहे. ही मालमत्ता गोरगरिब जनतेला लुटूनच गोळा केली आहे. सामान्य लोकांच्या खिशातले पैसे लुटणाऱ्या भ्रष्ट आमदार, खासदारांची संख्या काँग्रेसमध्ये मोठी आहे. त्यामुळे आम्ही साहू यांच्यासह काँग्रेसचा निषेध करीत आहोत.आंदोलनात माजी नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, माजी नगरसेविका सविता मदने, माजी महापौर संगीता खोत, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार,.शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दीपक शिंदे, अश्विनी तारळेकर-भिसे आदी सहभागी झाले होते.
सांगलीत झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने
By अविनाश कोळी | Published: December 11, 2023 11:46 AM