सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच असून गेल्या पाच दिवसांत ७८ बाधितांचा मृत्यू झाला. दररोज तासाला एक सरण जळत असल्याचे स्मशानभूमीतले चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे स्वत:ची, समाजाची काळजी घेत नियम पाळणे हा एकमेव उपाय यावर दिसत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत आहे. महिन्याभरात १७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा गेल्या पंधरा दिवसांत आणि आता गेल्या पाच दिवसांत अधिकच वाढला आहे. मागील पाच दिवसांत ७८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे आकडे चिंता वाढविणारे आहेत. स्मशानभूमीतील चित्र याहून अधिक चिंताजनक व धक्कादायक आहे. दररोज पहाटे ६ ते रात्री १० या वेळेत सरणं रचली जातात. दररोज सरासरी १५ मृत्यू होत आहेत. त्यामुळे १६ तासांत १५ जणांवर अंत्यसंस्कार करताना तासाला एक सरण जळताना दिसत आहे. अंत्यसंस्कारासाठी नियुक्तीस असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही हे चित्र पाहून धक्का बसत आहे. त्यामुळे नियम मोडत फिरणाऱ्या लोकांनी आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखणे आवश्यक आहे. बेफिकिरीची ही वाट जिल्ह्यातील चित्र आणखी भयावह करू शकते.
चौकट
चाळीस सरणांची व्यवस्था
मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर कोविड मृतांसाठी स्मशानभूमी केली आहे. या ठिकाणी एका दिवसात जास्तीतजास्त चाळीस लोकांवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. यासाठी लागणारे सरण या ठिकाणी उपलबध केले आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य मोठ्या प्रमाणावर येथे आणले आहे.
चौकट
टायगर ग्रुपकडे जबाबदारी
कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सांगलीच्या टायगर ग्रुपवर आहे. या ग्रुपचे सात सदस्य सध्या येथे कार्यरत आहेत. सलग १६ तास ते स्मशानभूमीत थांबतात. मध्यरात्री बोलावणे आले तरी ते त्या ठिकाणी जातात.
कोट
गेल्या पाच दिवसांत मृतदेह वाढले आहेत. सलग १६ तास अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेत टायगर ग्रुपचे कार्यकर्ते कार्यरत असतात. आम्हाला मध्यरात्री बोलावले तरीही स्मशानभूमीत हजर होतो. स्मशानभूमीतील ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी व संसर्ग टाळावा.
- पिंटू माने, टायगर ग्रुप, सांगली.