सातारा : ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा नारा सर्वत्र दिला जात आहे. झाडे लावली तर ती जगविण्याचे आव्हान आहे; पण जी झाडे आहे ती देखील जाळून टाकण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात वाढत चालला आहे. याकडे पर्यावरणवादीसह शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून, यावर वेळीच उपाययोजना राबविली गेली नाही तर या वृक्षांचे जळीतकांड थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय जागेवरील मोठी वृक्ष जाळून तोडण्याचा प्रकार अलीकडील दोन वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे महामार्गाबरोबर अनेक ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गावर वड, जांभूळ, आंबा आदी झाडे जाळून तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आजअखेर लाखो झाडांची कत्तल अशी झाली आहेत. तर अनेक झाडे सध्या या आगीत होरपळत आहेत. तरीही याविषयी शासनाने गांधारीची भूमिका बजावत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी ‘लोकमत’समोर व्यक्त केला.झाडाच्या खोडाला आग लावल्यानंतर ते विझविण्याचा प्रश्नही कोणाकडून लवकर केला जात नाही. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी वनअधिकारी, महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याने विघ्नसंतोषी व्यक्तींनी ही झाडे तोडताना कोणताच विचार करत नाही, याला आळा बसला पाहिजे. (प्रतिनिधी)झाडाची सालही काढली..खोड जाळण्याबरोबर काहीजण झाडाच्या बुंद्याची साल काढत आहे. यामुळे कालांतराने साल काढलेल्या बुंद्याला वाळवी लागून झाड कमकुवत होते. पाऊस, वाऱ्यामध्ये हे झाड कोसळते. त्यामुळे जाळण्याबरोबर आता साल काढण्याचा प्रकारही आता वाढला आहे. अजामीनपात्र गुन्हावृक्ष जाळणारी व्यक्तीवर तसेच त्यांच्या घरी जळणासाठी झाडांच्या फांद्या दिसल्या तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, तरच ही तोड थांबेल, यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.साताऱ्यातील गोडोली तसेच बोगदा ते डबेवाडी या मार्गावर सध्या वृक्ष जाळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाच्या हद्दीतील जांभळाची झाडे जाळली आहेत. त्यामुळे हा रस्ता आता भकास झाला आहे.
वृक्षांचे जळीतकांड अजूनही सुरूच
By admin | Published: July 22, 2016 11:21 PM