तासगाव : नेहरूनगर (ता. तासगाव) हद्दीत पाचव्या मैलापासून काही अंतरावर ३० ते ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आला. याबाबत घातपाताचा संशय होत व्यक्त होत आहे. वन विभागाच्या जागेत लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा मृतदेह आढळून आला. आगीत जळल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नेहरूनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत तासगाव ते पाचवा मैल महामार्गापासून काही अंतरावर वन विभागाची जमीन आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आग लागली होती. या आगीची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आग आटोक्यात आणल्यानंतर याच ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बेवारस मृतदेह असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही माहिती तासगाव पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिस तत्काळ घटनास्थळी हजर झाले. आगीत मृतदेह जळाला असल्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षे वयाचा तरुणाचा हा मृतदेह असून, याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
नेहरूनगर हद्दीत जळालेल्या तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय; सांगली जिल्ह्यातील तासगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 3:28 PM