तासगाव : तासगाव- हातनूर रस्त्यावर गोटेवाडी गावाजवळ बुधवार, दि. १७ रोजी सकाळी समाेरून येत असलेल्या बसला रस्ता देताना झालेल्या अपघातात बस साइडपट्टीवरून घसरून रस्त्याकडेच्या चरीत गेल्यामुळे दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. रस्त्याकडेला कलंडलेली बस झाडाला टेकल्याने माेठा अपघात टळला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विटा आगाराची खानापूर- कोल्हापूर बस (क्र. एमएच १५ बीटी २९१५) हातनूरमार्गे तासगावला चालली होती. बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. गोटेवाडी गावाजवळ समोरून हातनूरकडे येणाऱ्या तासगाव आगाराच्या बसला चुकविण्यासाठी विटा आगाराच्या बसच्या चालकाने गाडी रस्त्याच्या साइडपट्टीवर घेतली. पावसामुळे ओल्या झालेल्या साइडपट्टीवरून गाडी घसरून रस्त्याकडेच्या चरीत कलंडली. यावेळी बसमधील साहित्य व प्रवासी अंगावर पडल्यामुळे साईराज पाटील व साहिल पाटील हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.रस्त्याकडेला असलेल्या झाडाला डावी बाजू टेकल्यामुळे बस उलटण्यापासून वाचली. बसचा दरवाजा उघडत नसल्यामुळे सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधून बाहेर काढण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अपघातामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सांगलीतील गोटेवाडीत रस्त्याकडेला बस घसरली, विद्यार्थी जखमी; अन् माेठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 4:16 PM