मिरज : मिरजेत महेश पाटील या व्यावसायिकास अज्ञाताने चिठ्ठीद्वारे पाच लाखांच्या खंडणीसाठी मुलाच्या अपहरणाची धमकी दिली. फिल्मी स्टाईलने खंडणी मागणीच्या या घटनेची महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.मिरजेत पंढरपूर रस्त्यावर मगदूम मळा येथे राहणारे महेश रावसाहेब पाटील यांचा डेअरी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. महाराष्ट्रात व कर्नाटकात त्यांची कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोर असलेल्या दत्त मेडिकल या दुकानासमोर एक पाकीट ठेवले होते. पाकिटावर महेश पाटील यांचे नाव असल्याने दुकानदाराने ते पाटील यांना आणून दिले. पाकिटातील चिठ्ठीत महेश पाटील यांना उद्देशून, तुझा ११ वर्षांचा मुलगा आराध्य याचे अपहरण करण्यापूर्वी पाच लाख रुपये दे, नाहीतर मुलास गायब करेन. पोलिसांना किंवा इतर कोणाला कळविले तर मुलगा परत मिळणे कठीण होईल, अशी धमकी होती. पाच लाख रुपये पंढरपूर रस्त्यावरील धनगरी ढाब्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये रात्री आठनंतर आणून ठेवण्यास सांगितले होते. महेश पाटील यांनी चिठ्ठीसह पोलिसांत धाव घेत अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. फिल्मी स्टाईलने खंडणी मागणाऱ्याने फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलिसही चक्रावले आहेत.पोलिसांनी औषध दुकानातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता तेथे चिठ्ठी टाकणाऱ्याचे कॅमेऱ्यात चित्रण झालेले नाही. पाटील यांना कर्नाटकात वेगवेगळी कामे मिळाल्याचाही चिठ्ठीत उल्लेख असल्याने पाटील यांच्या परिचिताचे हे कृत्य असल्याचा संशय आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून संशयिताचा शोध सुरू असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.
Sangli: पाच लाखांसाठी मुलाच्या अपहरणाची व्यावसायिकास चिठ्ठीने धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:39 AM