सांगली : मिरज औद्योगिक वसाहतीतील सुशिलाबाई घोडावत निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर केला. दाभोलकर यांच्या विचारधनापासून अंध व्यक्ती आजवर वंचित होत्या. अंनिसने ही पुस्तके ब्रेल लिपित उपलब्ध केल्याने अंधांमध्येही अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार रुजण्यास मदत होणार आहे असे अंनिसने सांगितले.ब्रेल अभिवाचन उपक्रमाचे आयोजन अंनिसच्या सांगली शाखेने केले होते. अशोक येवले यांनी दाभोलकरांच्या दहा पुस्तिका ब्रेलमध्ये रूपांतरित केल्या आहेत. त्यांचा एक संच अंनिसतर्फे अंधशाळेत भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिवाचन केले. साक्षी जाधव हिने 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या ब्रेल पुस्तकातील काही उतारे वाचले. विशाल दिवटे याने 'फलज्योतिष शास्त्र का नाही?' या पुस्तकातील उतारे वाचले. प्रज्वल कुंभार याने `चमत्कार सादरीकरण' या पुस्तकातील उतारे वाचून दाखवले.अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, मुलांनी विचारलेले प्रश्न लोकांचे डोळे उघडवणारे आहेत. डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांतून अंध विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, विज्ञानाची कवाडे उघडी होतील.यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, प्रा. अमित ठाकर, अंधशाळेचे अध्यक्ष विष्णू तुळपुळे, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा, आशा धनाले आदी उपस्थित होते. गोरख कुचेकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका उज्वला हिरेकुडी यांनी आभार मानले. संयोजन अर्चना बारसे, मंजुषा वाकोडे, वृंदा सातपुते आदींनी केले.
तीन लाखांची देणगीअभिवाचन कार्यक्रमात अंध मुलांची शैक्षणिक जिज्ञासा पाहून अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी दिवंगत पत्नी माधुरी यांच्या स्मरणार्थ अंधशाळेसाठी तीन लाख रुपयांची देणगी दिली.
कावळा पिंडाला का शिवतो?पुस्तक वाचनानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. ग्रहणामुळे अंधत्व, अपंगत्व येते का?, वास्तुदोष असतो का?, बाधित जागी गेल्यानंतर ताप येतो आणि लिंबू टाकल्यानंतर तो जातो हे कसे काय?, पहाटेची स्वप्न खरी होतात का? कावळा पिंडाला का शिवतो? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषेत समजावून सांगितली.