सांगली : टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात ‘ट्राय’च्या केबल, डीटीएचच्या नव्या निर्णयाची २९ डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांची नको असलेल्या वाहिन्यांचे पैसे भरण्यापासून सुटका झाली असली तरी आवश्यक वाहिन्यांसाठी स्वतंत्रपणे पैसे मोजावे लागणार आहेत. ‘ट्राय’ने नियम करताना ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मासिक बिलात ४० टक्क्यांहून अधिकची वाढच होणार आहे.
डीटीएच कंपन्यांची मनमानीमुळे नको असलेल्या किंवा पाहत नसलेल्या वाहिन्यांचे बिल अदा करण्याची वेळ ग्राहकांवर आली होती. याबाबत ट्रायकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी केबल, डीटीएच आणि मनोरंजन वाहिन्यांचे प्रसारण करणाऱ्या सर्व यंत्रणांना एकाच नियमावलीत आणण्याचे नियोजन सुरू होते. त्यानुसार आता नव्या नियमांची २९ डिसेंबरपासून अंमलबजावणी होत आहे.
नव्या नियमानुसार ग्राहकांना १०० चॅनेलसाठी १३० रुपये अदा करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे या १०० चॅनलमध्ये ‘फ्री टू एयर’ असलेल्या सरकारी वाहिन्या व ज्या कधीही पाहिल्या जात नाहीत, अशा वाहिन्यांचाच भरणा आहे. पूर्वी याच वाहिन्या डीटीएचवर केवळ ९९ रुपयांना पहायला मिळत होत्या. सरकारी वाहिन्यांपेक्षा खासगी वाहिन्यांनाच ग्राहकांची अधिक पसंती असताना १३० रुपयांचे अधिक त्यावर १८ टक्के जीएसटी म्हणजेच १५५ रुपयांचे ‘पॅकेज’ ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे.
या वाहिन्यांव्यतिरिक्त इतर प्रत्येक वाहिनीसाठी पन्नास पैसे ते १९ रुपयांपर्यंतची रक्कम दरमहा भरावी लागणार आहे. सध्या केबल व्यावसायिकांकडून ग्रामीण भागात १६० ते २०० रुपयांपर्यंत दरमहा बिल घेतले जाते, तर शहरी भागात २८० ते ३६० रुपयांपर्यंत बिल घेतले जाते. ‘एचडी’ वाहिन्यांसाठी वेगळा आकार घेतला जातो. एवढ्या किमतीत मराठी, हिंदी, इंग्रजी, आध्यात्मिक, फूड, फॅशन, ट्रॅव्हल, कार्टून, क्रीडाविषयक, माहिती देणाºया चारशेवर वाहिन्या पहावयास मिळतात. सध्या सरासरी महिन्याला ३०० रुपयांत महिनाभर सर्वच वाहिन्या पहायला मिळत असताना, नवीन नियमामुळे हेच बिल ५०० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. जे ग्राहक सर्वच चॅनेलचा ‘पॅक’ घेतील, त्यांना मासिक बिल ६०० ते ८०० रुपये मोजावे लागणार आहे. ग्राहकांकडून कधीही न पाहिल्या जात असलेल्या वाहिन्यांपासून सुटका होणार असली तरी प्रत्येक वाहिनीला स्वतंत्र पैसे अदा करावे लागणार असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.वाहिन्यांकडून ‘बुके’२९ डिसेंबरपासून मासिक बिलात बदल होणार असल्याने वाहिन्यांनी जोरदार जाहिरात सुरू केली आहे. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी अधिक त्यांच्याकडील कमी प्रेक्षक असलेल्या वाहिन्यांचा समावेश असलेल्या १२ ते २५ वाहिन्यांचा ‘बुके’ तयार करण्यात आला आहे. या बुकेला ३२ रुपयांपासून ते ८० रुपयांचे बिल दरमहा भरावे लागणार आहे. हे दरही पूर्वीपेक्षा जादा आहेत.प्रत्येक वाहिन्यागणिक पैसे मोजावे लागणार असल्याने यापूर्वी फुुकट पाहता येणाºया वाहिन्यांनाही आता पैसे मोजावे लागणार आहेत.