सांगली : गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. पहाटे ट्रेकिंगला आलेल्या एका ग्रुपला हे निदर्शनास येताच त्यांनी सच्ची गोसेवा करीत त्या गाय वासरास चारा-पाणी खायला घालत त्यांच्या मालकापर्यंतही पोहचविले.सिध्देवाडी येथील दंडोबा डोंगराच्या परिसरात आसपासचे पशुपालक जनावरे हिंडवण्यासाठी जात असतात. त्यांच्याच कळपातील एक गाय गर्भावस्थेतील वेदना सुरू झाल्याने एका झाडाखाली थांबली. रात्रीत वासराला जन्म दिल्याने वेदना व भुकेने व्याकूळपणे रात्रभर एकाठिकाणीच उभी होती. मदतीची चिन्हे दिसत नसल्याने कावरीबावरीही झाली होती.पहाटे मिरजेतील आरंभ ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते.यावेळी या ग्रुपच्या सदस्यांना गाय अर्धमेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या जवळील खाद्यपदार्थ गाईला खायला दिले, पण एवढ्याने तिची भूक भागणार नव्हती. त्यामुळे सदस्यांनी डोंगरावर भटकून चारा गोळा करून तिला खायला दिला. त्यानंतर तिला डोंगरावर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डबक्यापर्यंत आणले व तिची तहानही भागविली. डोंगरावरील अन्य प्राण्यांपासून गायी व वासराचे संरक्षण करण्यासाठी काही सदस्य त्यांच्या जवळ थांबले व काहीजण डोंगर उतरुन आसपासच्या शेतकऱ्यांना भेटून पशुपालक असणाऱ्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना गायी व वासराची माहिती दिली. अखेर मालकापर्यंत ही दोन्ही जनावरे पोहच केल्यानंतर या सदस्यांनी डोंगर सोडले.त्यांच्या या प्राणीप्रेमाने शेतकरीही भारावून गेले. ग्रुपचे सदस्य असलेले संतोष कुलकर्णी, उमेश माळी, अमोल आगळगावे, अविनाश खोबरे, सागर मगदुम, गणेश ईसापुरे, अक्षय आगळगावे या सर्वांना शेतकऱ्याने धन्यवाद दिले.
गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 7:32 PM