सांगली : सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच विविध धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले असून संध्याकाळ पर्यंत हे पथक जिल्ह्यात दाखल होईल. इस्लामपूर व सांगली या दोन ठिकाणी हे पथक तैनात करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
आयर्विन पुल सांगली येथे आज सायंकाळी ५.४५ वाजता पाण्याची पातळी ४६.९ फूट होती. कोयना धरणातून १ लाख ३ हजार ६००, वारणा धरणातून ३८ हजार २२० तर अलमट्टी धरणातून ३ लाख ३ हजार ५२५ विसर्ग होत आहे.जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ, ओढे नाले यांना मोठ्या प्रमाणावर आलेले पाणी या पार्श्वभूमिवर नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करून नये. वीज मोटारी, इंजिने, शेती अवजारे व पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२३३२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २६७२१००), पाटबंधारे नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३०१८२०) आणि महानगरपालिका कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३७३३३३) या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.