सांगलीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत वादळापूर्वीची शांतता, भाजप-शिवसेनेत उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:55 PM2023-09-11T12:55:33+5:302023-09-11T12:56:09+5:30
पवार यांनी महाडिक बंधूंसोबत राजकीय खलबते?
अशोक पाटील
इस्लामपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूरकडे जात असताना भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे कासेगाव-पेठ येथे जंगी स्वागत केले. याचवेळी इस्लामपूर, शिराळा मतदारसंघातील जयंतरावांच्या राष्ट्रवादीत वादळापूर्वीची शांतता जाणवत होती. मात्र, भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर येथे उत्तरदायित्व सभा रविवारी होती. परंतु, सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील जयंत पाटील यांच्या मूळ गावी कासेगाव येथे अजित पवार सायंकाळी ४ वाजता पोहोचले. यावेळी सांगलीचे अजित पवार गटाचे माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
जिल्ह्यातील राजकारणात ‘जिथे वनश्री तिथे विजयश्री’ असा राजकीय महाडिक पॅटर्नचा नारा पेठ नाक्यावर होता. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी हाच पॅटर्न भाजपमध्ये राबवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्रातील व राज्यातील नेते पेठनाक्यावर थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरकडे रवाना होताना व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत थांबून दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे हजर होते. पवार यांनी महाडिक बंधूंसोबत राजकीय खलबते केल्याचे समजते.
एकंदरीत इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद असल्याचे मानले जाते. मुख्यत: जयंत पाटील यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार आपला गट प्रबळ करण्याच्या तयारीत आहेत. याला भाजप-शिवसेनेने साथ दिली आहे. सध्या तरी पुणे-बेंगलोर महामार्गावर बारामतीच्या पवार पॅटर्नचा ट्रेलर सुरू झाला आहे.
अजित पवार हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री अमित शाह यांची साथ आहे. आमचे नेते जयंत पाटीलच आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -विजय पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी