कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गेल्या आठवड्यात बिबट्याचे दर्शन घडले होते. यानंतर वन विभागासह स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेतला होता; पण बिबट्या आढळून आला नाही. यामुळे आता वन विभागाने परिसरात सीसी टीव्ही बसवून बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
गत आठवड्यात बिबट्या दिसून आला होता. दुसऱ्या दिवशी तो तुंगाकडे गेल्याचे ठसे प्राणीमित्र व वन विभागाने शोधले होते. त्यानंतर काही दिवसांनी महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील भागात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली. त्याठिकाणी शोध घेतल्यानंतर आष्टा वाट परिसरात पुन्हा एकदा ठसे दिसले; पण काही नागरिकांनी ते तरसाचे किंवा कुत्र्याच्या पायाचे ठसे असल्याचे सांगितले.
सततच्या पावसामुळे ठसे बुजतात. शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असूनही शेतकरी बिबट्याच्या भीतीने शेतात जात नाहीत. वन विभागाने तत्काळ बिबट्या शोधावा व नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी रयत क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव यांनी केली आहे.