सांगली : यंदा प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह नाही. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली असली तरी, वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने निर्माण झालेले वादाचे वादळ शमले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्टÑवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने सक्रिय झाले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा मिळाली असली तरी, जिल्ह्यात काँग्रेस, राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याची दखल घेत काँग्रेसच्याच विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांसह विविध ५६ पक्षांची ताकद यानिमित्ताने एकवटली आहे. या सर्वांच्याच ताकदीची परीक्षा यानिमित्ताने होत आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी यापूर्वी महापालिका निवडणुकीत प्रामाणिकपणे सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याठिकाणी काँग्रेस-राष्टÑवादीमधील समन्वयाचा अभाव दिसून आला होता. लोकसभा निवडणुकीत या चुका टाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी ताकद पणाला लावली आहे.राष्टÑवादीच्या कार्यालयांमध्ये याबाबतचे नियोजन सुरू आहे. बुथनिहाय रचना करून त्यांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुकाध्यक्ष व त्यांच्या कार्यालयांमधून प्रचारकार्य वेगाने सुरू आहे. प्रचारकार्यातही राष्टÑवादी कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही मैदानात उतरले आहेत. यापूर्वी काँग्रेस भवनात अनेक नियोजन बैठका पार पडल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या सांगलीतील कार्यालयातून विशाल पाटील यांच्या प्रचाराचे सर्व नियोजन करण्यात येत आहे. याठिकाणी दररोज सकाळी आणि सायंकाळी कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. जयश्रीताई मदन पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व अन्य पदाधिकारी यांच्यामार्फत दररोज प्रचाराचा आढावा घेतला जात आहे.
‘स्वाभिमानी’च्या उमेदवारासाठी दोन्ही काँग्रेसची फळी प्रचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:24 PM