वारणावती : शिराळा तालुक्यातील कोकरूड-चांदोली रस्त्यावरील शेडगेवाडी येथील कालव्याच्या बोगद्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे वाहने व पादचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यांना कसरत करीत ये-जा करावी लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. तरीही संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील कोकरूड-चांदोली रस्त्यावरील शेडगेवाडी फाटा ते नाठवडेदरम्यान रस्त्यावरून वारणा कालवा गेला आहे. धरणाच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले की या कालव्यातून झिरपणारे पाणी व गळतीमुळे बोगद्यामध्ये पाणी साठून राहते. गुडघाभर पाणी साठलेले असते. त्यातून कसरत करीत वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांना व ये-जा करणाऱ्या लोकांना गुढघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागते. अशातच एखादे वाहन आले की जीव मुठीत धरून जावे लागते आहे. वाहनांनाही ते कादायक आहे. सध्या कारखान्याचे ऊसवाहतूक ट्रॅक्टर व इतर वाहनांची वर्दळ असते. येथे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत आहेत.
चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून झिरपणारे पाणी कालव्याखालील बोगद्यामध्ये येते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व धरणाच्या कालवे विभागाने तातडीने लक्ष घालून तुंबलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी, अशी वाहनधारक आणि प्रवाशांनी मागणी केली आहे.
फोटो- चांदोली धरणाच्या कालव्याचे पाणी शेडगेवाडी येथील बोगद्यामध्ये साठून राहिल्याने वाहनधारकांना अशा धोकादायक स्थितीत ये-जा करावी लागते.