सांगली : राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, शरद पवारांना कोरोना संबोधून पडळकरांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली. भाजपचे अन्य नेतेसुद्धा या वक्तव्याशी सहमत नाहीत. त्यामुळे भाजपने केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पडळकरांची आमदारकी काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करावी. अशी कारवाई न झाल्यास भाजपसुद्धा या कटकारस्थानाचा भाग असल्याची महाराष्ट्राला खात्री पटेल. पडळकरांवर कारवाई झाल्यास खरोखर भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे, हे आम्ही जाहीरपणे कबूल करू.शरद पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात न येण्याचा सल्ला देऊन मुंबईतील कोरोनाबाधितांच्या प्रमाणाचा उल्लेख पडळकरांनी करून त्यांचाही अवमान केला आहे. तेसुद्धा मुंबईतूनच आमदारकीची शपथ घेऊन पंढरपुरात आले होते. मागील दाराने आमदार होऊन समाजाची, विविध पक्षांशी गद्दारी करणाऱ्या पडळकरांची कोणाला सल्ला देण्याची लायकी नाही.
ज्या भाजपच्या नेत्यांना शिव्यांची लाखोली पडळकरांनी वाहिली त्याच पक्षाच्या वळचणीला ते गेले आहेत. भाजपच महाराष्ट्राला आणि देशाला लागलेला कोरोना असून सत्तेच्या मोहापायी हा पक्ष कोणत्याही थराला जात आहे. मानसिक रोगी बनून कोणतीही वक्तव्य भाजप नेते करीत आहेत, असे विभुते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, महेंद्र चंडाळे, मयुर घोडके, अमोल पाटील आदी उपस्थित होते.विठ्ठलाचे नाव घेऊ नका!ज्या पडळकरांनी बिरोबाची खोटी शपथ घेऊन एका देवाला फसविले त्यांनी आता विठ्ठलाचे नाव घेऊन दुसऱ्या देवाला फसवू नये. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी यायचे की नाही ते पंढरीचा विठ्ठल व भक्त ठरवतील. त्यामुळे पडळकरांनी आता विठ्ठलाच्या नावावर कोणाला सल्ले देऊ नयेत, असे विभुते व शंभोराज काटकर म्हणाले.