सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील स्त्री भ्रूणहत्याकांडातील आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याची वैद्यकीय सनदही रद्द करण्याची मागणी स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तसेच म्हैसाळ प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी करून निदर्शनेही केली.सांगली शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाचे कोषाध्यक्ष नीलेश शेंडगे, अध्यक्ष सचिन खंबाळे, सचिव योगेश नाडकर्णी, सागर वंजेरी, कुलदीप बेडगे, पंकज खोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाने जाऊन मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, जिल्हा प्रशासनाकडे निनावी पत्रद्वारे डॉ. खिद्रापुरे याच्या गैरकारभाराविरोधात तक्रार दाखल झाली होती. तरीही प्रशासनाने दखल का घेतली नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाने म्हैसाळ येथे भेट देऊन, तेथे असा कोणताही प्रकार घडत नसल्याचा बोगस अहवाल दिला होता. या प्रकारचा अहवाल देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा येत्या चार दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही अध्यक्ष सचिन खंबाळे व नीलेश शेंडगे यांनी दिला आहे.(वार्ताहर)
खिद्रापुरेची वैद्यकीय सनद रद्द करा
By admin | Published: March 08, 2017 11:41 PM