सांगली : आरक्षणाचा विषय सोडून विविध राजकीय पक्षांचे नेते इतर कार्यक्रमात व्यस्त आहेत. समाजातील नेत्यांनी राजकीय आणि पक्षीय कार्यक्रम रद्द करुन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी पत्रकार बैठकीत करण्यात आले.सांगलीत आयोजित मराठा क्रांती मोर्चा नियोजन बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींनी याबाबत आपले मत व्यक्त केले. मराठा आरक्षणावर पदाधिकारी म्हणाले की, ओबीसी समाजातील नेते समाजाविषयी आपली भूमिका स्पष्ट करीत असताना मराठा प्रतिनिधी अजूनही शांत आहेत. समाजातील आमदार, खासदार यांनी आपली भूमिका जाहीर करावी. समाजासाठी रस्त्यावर उतरावे. इतर कोणाचे आरक्षण काढून आम्हाला द्या, अशी कधीच भूमिका नसल्याने कोणीही याबाबत गैरसमज ही करू नयेत. मराठा समाजाचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.कोणतेही शासन असले तरी ते याकडे दुर्लक्ष करते. म्हणूनच मराठा समाजाला ५० टक्केच्या आतून ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी रविवार दि. १७ रोजी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे.रविवारी विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात होईल. राममंदिर चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.अश्विनी रणजित पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आशा पाटील, जयश्री घोरपडे, प्रणिती पवार, कविता बेंद्रे, प्रिया गोठखिंडे, अनिता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Maratha Reservation: राजकीय कार्यक्रम रद्द करा..आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन
By अविनाश कोळी | Published: September 11, 2023 5:10 PM