सांगली : राष्टÑवादी किंवा अन्य पक्षातून येणार्या उसन्या उमेदवाराला सांगली विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी आज (बुधवारी) सांगलीतील भाजपच्या पदाधिकार्यांनी पक्षाचे नेते नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्याकडे केली. दिल्ली येथील भेटीत या नेत्यांनी निष्ठावंतांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, नूतन खासदार संजय पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी नुकतीच नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. या भेटीत विधानसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा करण्यात आली. संजय पाटील यांना पक्षप्रवेशावेळीच उमेदवारी दिल्यानंतर सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याला यशही मिळाले आहे. आता पुन्हा विधानसभेला बाहेरील उमेदवार लादण्यात येऊ नये, अशी मागणी केळकर यांनी केली. हाच पायंडा पडला, तर निष्ठावंतांना कधीच संधी मिळणार नाही. पक्षीय वातावरणही बिघडेल. इतर पक्षातून येणार्या नेतेमंडळींना पक्षप्रवेश देताना उमेदवारी देण्यात येऊ नये, असे मत मांडण्यात आले. गडकरी यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या भावना नेतेमंडळींच्या बैठकीत मांडण्यात येतील. दिल्ली येथे बुधवारी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचीही भेट केळकर यांनी घेतली. सांगली विधानसभा मतदार संघासाठी चाललेल्या हालचाली त्यांनी त्यांना सांगितल्या. उमेदवारीसाठी त्यांनीही दावाही सांगितला. या सर्व राजकीय घडामोडींमुळे स्थानिक पदाधिकारी व इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. सांगली विधानसभा मतदार संघातून भाजपकडे सध्या इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारीवरून दोन गटही पडले आहेत. त्यातच राष्टÑवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनीही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. राज्यात पुन्हा आघाडी करून निवडणुका लढविण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे दिनकर पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. सांगलीच्या जागेवर काँग्रेसची दावेदारी आहे. त्यामुळे त्यांना राष्टÑवादीत राहून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. संभाजी पवारांनी लोकसभा निवडणुकीत बंडाची भूमिका घेतल्यामुळे त्यांनाही उमेदवारी देण्यात येऊ नये, अशीही मागणी आता काही पदाधिकार्यांकडून केली जात आहे. पक्षविरोधी काम करणार्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ नये, याबाबतही तक्रारी सुरू आहेत. विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमधील इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावली आहे. यासाठी इच्छुकांनी मुंबई व दिल्ली वारीही केली आहे. (प्रतिनिधी) धोरण ठरविण्याची मागणी सांगली विधानसभेसाठी उसना उमेदवार द्यायचा, की निष्ठावंतांना संधी द्यायची, याचे धोरण तातडीने ठरविण्यात यावे, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार संभाजी पवार यांनी त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांच्यासाठी दावा केला आहे. या सर्व दावेदारीत उमेदवारीचा निर्णय घेताना राज्यातील नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उसन्या उमेदवाराला भाजपमधून विरोध
By admin | Published: May 22, 2014 12:36 AM