देवराष्ट्रे : कृष्णा कारखान्याच्या आजपर्यंतच्या निवडणुकीत घाटमाथ्यावरील मतदान निर्णायक ठरले आहे. पण यंदा ५० टक्के मतदार घटले असून, २,६४१ मतदार पात्र आहेत. त्यातच तिन्ही पॅनलनी देवराष्ट्रे गावातीलच उमेदवार दिल्याने चुरस निर्माण झाली आहे.
गेल्या दोन निवडणुकीत घाटमाथा संस्थापक पॅनलचा बालेकिल्ला ठरला. मात्र, यंदा कृषी-सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
कडेगाव, खानापूर व पलुस तालुक्यातील २३ गावांमध्ये ३,९०० मतदार आहेत. यातील १,३०० मतदार मृत आहेत, तर ऊस नेला जात नाही, साखर मिळत नाही म्हणून अनेक सभासदांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घाटमाथ्यावरील मतदानात मोठी घट झाली आहे. सत्ताधारी गटाने सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात सभासद घटवले व मृत वारस नोंदी न केल्याने घाटमाथ्यावरील सभासदांमध्ये ५० टक्के घट झाली आहे.
सोनहिरा परिसरात कृष्णा कारखान्याचे सभासद अधिक आहेत. हा परिसर कदम गटाचा बालेकिल्ला आहे. गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदा विश्वजीत कदम यांनी जास्त ताकद लावून कार्यकर्ते कामाला लावले आहेत.
देवराष्ट्रे गावात ४२७ मतदान असून, याच गावात रयत पॅनलचे बापूसाहेब पाटील, सहकार पॅनलचे बाबासाहेब शिंदे, संस्थापक पॅनलचे माणिक मोरे यांच्यात चुरस आहे.