सांगली : शहरातील वर्दळ असलेल्या चौकांवर, गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शुक्रवारी दिवसभर शहरातील अशा गर्दीच्या ठिकाणी उमेदवारांच्या रिक्षांनी ठाण मांडले होते. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण सर्वत्र दिसत होते. दुपारी एक तास झालेल्या मुसळधार पावसाच्या आचारसंहितेचा फटका उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना बसला.सांगली विधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढतीमुळे प्रचारासाठी चढाओढ सुरू आहे. प्रचारासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत उमेदवारांनी आता शेवटच्या टप्प्यात जोर लावला आहे. शुक्रवारी दिवसभर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, गल्लीबोळात, महत्त्वाच्या रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये प्रचाराचे वातावरण दिसत होते. जिथे गर्दी तिथे प्रचाराची यंत्रणा लावण्यावर उमेदवारांचा भर आहे. सांगली शहरातील गावठाणासह विस्तारित भागातही प्रचाराचा जोर शुक्रवारी दिसून आला. गावभागातील अमरधाम स्मशानभूमीपासून सिद्धार्थ चौकापर्यंत उमेदवारांच्या प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसून आल्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास याठिकाणी काही कार्यकर्ते रोहिदासनगरमध्ये प्रचारपत्रके वाटत फिरत होते. याठिकाणच्या एका कट्ट्यावर काही तरुण प्रचारपत्रके हाती घेऊन निवडणुकीच्या चर्चेत मग्न होते. पुढे सिद्धार्थ चौक परिसरात त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांचा ‘रोड शो’ सुरू होता. स्टँड परिसर, वैरण बाजार, शिवाजी मंडई या गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या रिक्षा ध्वनिक्षेपकावरून प्रचार करीत थांबून होत्या. या रिक्षांमधून प्रचारपत्रकेही वाटण्यात येत होती. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने उमेदवारांनी प्रचार करणाऱ्या रिक्षांची संख्या वाढविल्याचे दिसून येत होते. सांगलीच्या वसंतदादा बँकेसमोरील रस्त्यावर भाजपच्या प्रचार कार्यालयासमोरच मोठ्या स्क्रिनच्या दोन व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी भाजपच्या जाहिराती स्क्रिनवरून दाखविण्यात येत होत्या. काही कार्यकर्तेही स्क्रिनसमोरच गर्दी करून उभे होते. विश्रामबाग परिसरातही प्रचाराचा माहोल दिसून येत होता. याठिकाणी गणपती मंदिराजवळ शिवसेनेच्या प्रचारसभेची तयारी सुरू होती. याच चौकात पुढे राष्ट्रवादी, भाजपच्या रिक्षा लाऊडस्पिकर सुरू करून उभ्या होत्या. (प्रतिनिधी)सांगलीत व्यत्यय पावसाचाप्रचार रंगात आला असतानाच दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विश्रामबाग गणपती मंदिर चौकापासून काही महिला कार्यकर्त्या प्रचार करीत जात होत्या. पावसामुळे मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाशेजारील एका इमारतीत त्यांनी आसरा घेतला. तासभर पावसाने जणू आचारसंहिता जाहीर केल्याचे चित्र होते. प्रचाराची यंत्रणा या मुसळधार पावसामुळे ठप्प झाली होती. सांगलीत दुपारी शिवसेनेच्या सभास्थळीही पावसाने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. खुर्च्यांंवर, स्टेजवर व परिसरात पाणी साचून राहिले होते. कार्यक्रम सुरू होईपर्यंत कार्यकर्त्यांची नुसती धावाधाव सुरू होती. मतदार सांगताहेतजोर कोणाचा?ठिकठिकाणी निवडणुकीत जोर कोणाचा, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता, प्रत्येक भागात वेगवेगळ्या उमेदवारांची नावे घेण्यात आली. रोहिदासनगर येथे एका कट्ट्यावर बसलेल्या तरुणांनी या प्रश्नावर ‘धनुष्यबाण’ अशा एका शब्दातच जोर कोणाचा हे सांगितले. शंभर फुटी रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या एका चहा टपरीवाल्याला, निवडणुकीबाबत काय वाटते, असे विचारले असता तो म्हणाला की, निवडून कोण येणार हे सांगता येत नाही, पण आमच्या भागात सध्या काँग्रेसचा जोर आहे.विश्रामबाग गणपती मंदिर चौकातील एका बांधकाम कामगाराला निवडणुकीविषयी विचारले असता तो म्हणाला, कोणीही निवडून आले तरी काय फरक पडणार आहे. रोजचं रडं आहेच की. आम्हाला त्या निवडणुकीशी काहीच देणं-घेणं नाही. बच्चेकंपनीने उडविले पत्रकाचे विमानरोहिदासनगर येथे काही मुले रिक्षातून शाळेला निघाली होती. इतक्यात एक कार्यकर्ता प्रचारपत्रके वाटत त्याठिकाणी आला. मुलांनी त्या कार्यकर्त्याकडून प्रचारपत्रके मागून घेतली. निवडणुकीची काहीही कल्पना नसलेल्या या निरागस मुलांनी नंतर या पत्रकांचे विमान करून हवेत उडविले. सांगलीच्या सिद्धार्थ चौकात घरासमोरील अंगणात काही मुले अभ्यास करीत बसली होती. तितक्यात मदन पाटील यांचा ‘रोड शो’ या मार्गावर आला. मुलांनी अभ्यास सोडला आणि या प्रचार कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले.
गर्दीच्या ठिकाणांवर उमेदवारांची नजर...
By admin | Published: October 10, 2014 11:18 PM