सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुख्य परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला परीक्षार्थींनी विरोध दर्शविला असून, पारंपरिक पद्धतीनेच घेण्याची मागणी केली आहे.
आयोगाने यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप केली नसली, तरी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची परीक्षार्थींची माहिती आहे. एजन्सी नेमण्यासंदर्भातील निविदाही यापूर्वी प्रसिद्ध झाली होती. प्रश्नसंच तयार करणे, ऑनलाईन परीक्षा घेणे अशी कामे ही एजन्सी करेल.
परीक्षेची प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत करण्याने भ्रष्टाचाराला वाव मिळेल, असा परीक्षार्थींचा आक्षेप आहे. एमपीएससीसाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होण्याचीही भीती आहे. आजवर आयोगाच्या पारंपरिक परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करणाऱ्या तरुणांची उमेदीची वर्षे नव्या पॅटर्नमुळे वाया जाणार आहेत. प्रस्तावित खासगी एजन्सीच्या नव्या पॅटर्नचा त्यांना नव्याने अभ्यास करावा लागेल.
दक्षिणेसह देशभरात राज्य लोकसेवा आयोगाच्या चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या विविध राज्यांत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जात असल्याकडे तरुणांनी लक्ष वेधले आहे. यापू्र्वी महापोर्टलमध्ये गैरव्यवहार झाल्याने ते रद्द करावे लागले, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. आयोगाकडे मनुष्यबळ कमी असले, तरी त्यामुळे तरुणांच्या भविष्याशी खळखंडोबा करणे योग्य नसल्याचा परीक्षार्थींचा दावा आहे. गेली अनेक वर्षे ऑफलाईन परीक्षा सुरळीत होतात, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिका तपासणे, त्या सांभाळणे आदी प्रक्रिया जोखमीची, वेळखाऊ असल्याने आयोगाने ऑनलाईन परीक्षेचा प्रस्ताव ठेवला आहे, पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांची मते घेण्यात आलेली नाहीत. प्रशासनाने स्वत:च निर्णय घेऊन लादण्याची तयारी केली आहे.
चैौकट
का आहे आक्षेप?
ऑनलाईन परीक्षेमुळे मास कॉपी होईल, हा परीक्षार्थींचा प्रमुख आक्षेप आहे. आयोगाचे अधिकारी प्रत्येक केंद्रावर पोहोचण्यात मर्यादा असल्याने कॉपीला उत्तेजन मिळेल, अशी भीती परीक्षार्थींनी व्यक्त केली.
----------