आष्टा : आष्टा येथे श्री. दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून आष्टा परिसरात ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोडणी मशीनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान झाले. तसेच यावेळी परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.आष्टा परिसरातील हाबळ वाट या परिसरात वसंतदादा कारखाना दत्त इंडिया यांच्यावतीने ऊस तोडणी मशीनचा करार करून आष्टा परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. आज, गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू होती.
ऊस तोडणी मशीन मालक गोरख नामदेव शेंबडे (रा. कोठेवाडी ता. सांगोला) हे चालक म्हणून काम करीत असताना ऊस तोडणी मशीन मध्ये शॉर्टसर्किट होऊन मशीनने अचानक पेट घेतला. यात मशीन जळून खाक झाले. यात सुमारे ६० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान नजीकच्या पंचवीस ते तीस एकरमधील ऊस देखील पेटून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या घटनेची माहिती मिळताच आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, शेती अधिकारी मोहन पवार, अनिरुद्ध पाटील, आष्टा सेंटरचे राजाराम कराडे, सुरज आवटी यांच्यासह परिसरातील शेतकरी, शेतमजूर व कर्मचारी उपस्थित होते.