लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कागनरी (ता. जत) येथील लक्ष्मण आप्पाराया जगदाळे (वय २४) याच्या ऊसाच्या शेतात व घरी छापा टाकून ६२ हजार रुपयांचा ओला व तयार गांजा उमदी पोलिसांनी पकडला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली. उमदी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
पूर्व भागातील लक्ष्मण जगदाळे याचे कर्नाटकातील यत्नाळ सीमेलगत शेत आहे. त्याच्या ऊसाच्या शेतात व घरी गांजा असल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांच्या पथकाने छापा टाकला. शेतात चार फूट उंचीची गांजाची उग्र वास असलेली चार झाडे सापडली. त्यांचे वजन ३ किलो ८०० ग्रॅम होते. बाजारभावाप्रमाणे तो ३८ हजार रुपये किमतीचा आहे.
घरात पिशवीत तयार २४ हजार रुपयांचा १ किलो २०० ग्रॅम गांजा सापडला. गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार बसवराज महादेव कोष्टी यांनी फिर्याद दिली.